जळगाव - प्लॉटच्या परस्पर विक्री प्रकरणात खटला निकाली

                 जळगाव - मेहरूण भागातील प्लॉटच्या परस्पर विक्री प्रकरणात दाखल खटल्यात पोलिस निरीक्षकांनी चौकशीअंती सादर केलेला बी समरी रिपोर्ट न्यायालयाने ग्राह्य धरला असून, याप्रकरणी विद्या मुळे, सिद्धार्थ रायसोनी यांच्यासह आठ जणांविरुद्ध दाखल खटला निकाली काढला आहे. या निकालामुळे या प्लॉटचा व्यवहार कायदेशीर ठरला असून, सिद्धार्थ रायसोनी यांचा प्लॉटवरील मालकीहक्कही सिद्ध झाला आहे. 


                या खटल्याची पार्श्‍वभूमी अशी - मेहरूण शिवारातील सर्व्हे क्रमांक 434/2 मधील प्लॉट क्रमांक 26 हा सिद्धार्थ रायसोनी यांनी प्लॉटच्या मूळ मालक विद्या विजय मुळे यांच्याकडून 11 जुलै 2012 ला रीतसर खरेदी केला होता. त्याची नोंदणी, त्यावरील स्टॅम्प ड्यूटी आदी प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. या व्यवहारानंतर सुहासिनी सुभाष मुळे यांनी सामाईक मालकीचा मुद्दा उकरून काढत या प्लॉटच्या व्यवहाराविरुद्ध विद्या मुळे, सिद्धार्थ रायसोनी यांच्यासह आठ जणांविरुद्ध संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी याचिका न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश पाच मार्च 2013 ला दिले होते.

चौकशीअंती सत्य समोर 

             मुळात मेहरूण भागातील सर्व्हे क्रमांक 434/2 मधील प्लॉट क्रमांक 25, 26 व 31 चे मूळ मालक गणपत मुळे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सीताबाई यांचे या मालमत्तेवर नाव लावले. त्यांना सुभाष व विजय अशी दोन मुले असून, त्यामुळे सीताबाईंच्या निधनानंतर या दोन्ही मुलांची सामाईक मालकी आली. दोघा भावांनी एकत्र चर्चा करून प्लॉट क्रमांक 26 हा विजय मुळे यांनी, तर प्लॉट क्रमांक 31 हा सुभाष मुळे यांनी घेतला. या दोघा प्लॉटपैकी सुभाष मुळे यांच्या ताब्यातील प्लॉट क्रमांक 31 हा ग्यानचंद हासवानी यांना विकला, तेव्हा विद्या मुळे यांनी हरकत घेतली नाही. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये विद्या मुळे यांनी त्यांच्या मालकीचा प्लॉट क्रमांक 26 हा सिद्धार्थ रायसोनी यांना विकला, असे तथ्य समोर आल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयाला बी समरी रिपोर्ट सादर केला.

पोलिसांचा रिपोर्ट व विद्या मुळे यांनी दिलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य मानले. तसेच मुळे कुटुंबाची आपसांतील विभागणी, तलाठी कार्यालयातील फेरफार नोंद, प्लॉट क्रमांक 26 च्या महसूल व महापालिका कराचा भरणा या बाबी ग्राह्य धरत न्यायालयाने सुहासिनी मुळे यांची तक्रार निकाली काढत या प्लॉटवरील शेखर रायसोनींच्या मालकीवर शिक्कामोर्तब केले आहे.
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment