खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून इचलकरंजीत पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

                       इचलकरंजी - येथील थोरात चौकातील पोलिस लाइनमध्ये एका           कॉन्स्टेबलने फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. इम्रान दिलावर सनदी (बक्कल नंबर 2103, वय 34, मूळ रा. कारदगा, ता. चिक्कोडी, सध्या रा. शिवाजी कॉलनी, पोलिस लाइन, कसबा बावडा, कोल्हापूर) असे त्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्याने खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली. तसेच, त्याने याबाबतची आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना त्याच्याजवळ मिळून आली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 


कॉन्स्टेबल सनदी तीन वर्षांपासून इचलकरंजी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याने काही काळ स्थानिक गुन्हे शोध पथकात काम केले आहे. त्याला गेल्या काही महिन्यांपासून व्हिडिओ गेमचा नाद लागला होता. या नादाने तो कर्जबाजारी झाल्याने त्याने काही खासगी सावकारांकडून आवाच्या सव्वा व्याजाने पैसे घेतले होते. याची वेळेवर परतफेड न झाल्याने सावकारांनी त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली वावरत होता. याची माहिती त्यांच्या घरच्यांना समजताच त्यांनी काही खासगी सावकारांची कर्जे भागविली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

                      इम्रान सनदी शहरातील पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याने त्याने थोरात चौकातील पोलिस लाईनमधील बिल्डींग नं. सीमध्ये खोली क्रमांक तीन भाड्याने घेतली होती. या खोलीत तो एकटाच राहत होता. त्याने बुधवारी (ता. 11) रात्री पोलिस ठाण्यात नाईट डुटी केली; पण तो मानसिक तणावाखाली असल्याने त्याने गुरुवारी (ता. 12) सकाळी या पोलिस ठाण्याच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यामुळे वरिष्ठांनी त्याची गैरहजेरी लावली. गुरुवारी संध्याकाळी घरच्याबरोबर झालेल्या संभाषणानंतर त्याने मोबाइल बंद केला. त्यानंतर सनदीने थोरात चौकातील पोलिस लाइनमधील राहत्या खोलीला आतून कडी लावून बेडरूममधील फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत त्याचा मोबाइल लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी तो राहत असलेल्या खोलीवर धाव घेतली. त्यावेळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

                           पोलिसांना पंचनामा करते वेळी घटनास्थळी खासगी सावकाराच्या कर्जबाजारीमुळे आत्महत्या करीत असल्याबाबतची लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळून आली. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. या चिठ्ठीवरून पोलिसांनी इम्रान यांच्या घरच्यांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी काही खासगी सावकारांची नावे दिल्याचे समजते. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून एका कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्यासह काही अधिकारी त्वरित इचलकरंजी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधीत सावकारांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याचे आदेश निरीक्षक शिवाजी कणसे यांना दिले. खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

खासगी सावकारांचे काय? 

खासगी सावकारांना ढोपरापासून खोपरापर्यंत सोलून काढण्याची भाषा यापूर्वी अनेकवेळा पोलिस दलात झाली आहे; पण कोणत्याही खासगी सावकारावर ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून एका पोलिस कर्मचार्‍याचाच बळी गेला. किमान यापुढे तरी पोलिस खाते खासगी सावकारांना सोलून काढणार काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment