पवनऊर्जा प्रकल्पासाठी मोफत जमीन मिळविण्याचा धुळे मनपाचा प्रयत्न

           धुळे - टिटाणे (ता. साक्री) येथील पवनऊर्जा प्रकल्पाचा प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता, विविध विभागांच्या एनओसी मिळाल्यानंतर महापालिकेने हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी लागणारी जमीन शासकीय असल्याने ती मोफत मिळावी, यासाठीही महापालिका प्रयत्न करणार आहे. 


                   पाणीपुरवठ्यासाठी लागणारे उच्चदाब विजेचे बिल महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडणारे ठरत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पवनऊर्जा प्रकल्प उभारून व त्यातून वीजनिर्मिती करून वीजबिलातून सुटका करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. टिटाणे (ता. साक्री) येथे हा प्रकल्प उभारण्यासाठी 2008 पासून प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरीच्या काळात पाठपुरावा न झाल्याने हा विषय मागे पडला. महापालिकेची आर्थिक स्थिती आता अधिकच डामाडोल झाल्यानंतर या विषयाला पुन्हा गती मिळाली. प्रकल्पाच्या प्रस्तावात जिल्हाधिकारी कार्यालयाने काही त्रुटी काढल्या होत्या, त्याची पूर्तता करण्यात आली. शिवाय सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, जिल्हा परिषद, जिल्हा उपनिबंधक, भूमिअभिलेख या विभागांच्याही एनओसी मिळाल्या आहेत. आवश्यक पूर्तता करून प्रस्ताव आता जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

जमीन मोफत मिळविण्याचा प्रयत्न 

                प्रकल्पासाठी लागणार्‍या जमिनीचे मूल्यांकनही करण्यात आले. एकूण 25 लाख 53 हजार 600 रुपये एवढे जमिनीचे मूल्यांकन आहे. महापालिकेला जमिनीची ही किंमत देऊन प्रकल्प उभारावा लागेल. जमीन शासकीय असल्याने ती मोफत मिळावी, यासाठी महापालिका प्रयत्न करणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

30.50 मिलियन युनिट वीज 

                  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी दोन वर्षापूर्वीच 16 कोटी रुपये लागतील असा अंदाज होता. यात पुन्हा वाढ होणार आहे. प्रत्येकी दोन मेगावॉटचे दोन पंखे उभारण्यात येणार आहेत. यातून एका वर्षात 30.50 मिलियन युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे. या विजनिर्मितीमुळे विजबिलावर होणारा खर्च वाचणार आहे. दरमहा 30 लाख रुपये वाचतील असा अंदाज आहे.
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment