बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार कायम

मालवण - मालवण तारकर्ली देवबाग किनारपट्टीवर अतिसंवेदनशील सीआरझेड क्षेत्रात बांधकाम करत अलिशान इमारती उभ्या करणाऱ्या २३ व्यवसायिकां विरोधात महसूल प्रशासनाने मालवण पोलिस ठाण्यात पाच महिन्यापूर्वी २४ मार्चला गुन्हे दाखल केले. त्यानंतर अनधिकृत बांधकाम प्रश्न पेटला, व्यवसायिकांच्या लढ्यात राजकीय पक्षांनी उडी घेतली. महसूलमंत्र्यांना भेटून पावसाळा कालावधीत ही अन्यायकारक कारवाई थांबवण्याबाबत भाजपच्या वतीने निवेदन सादर केले होते. पालकमंत्री केसरकर यांनी न्याहारी निवाससाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ही कारवाई थांबली असे वाटत असतानाच आज पोलिस प्रशासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या अनधिकृत बांधकामांचे पंचनामे हाती घेतले आहेत. त्यामुळे या व्यवसायीकांत भीतीचे वातावरण असून महसूल मंत्र्यांच्या भेटी नंतरही कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे. 
कोट्यवधी रुपये खर्चाचे आणि आशिया खंडातील एकमेव असे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले मालवण तारकर्ली देवबाग येथील पर्यटन विकास महामंडळाचे स्कुबा डायव्हिंग सेंटर इमारत अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या इमारतीबरोबरच तारकर्ली देवबाग येथील बडी आलिशान हॉटेल व अन्य २३ इमारतीही अनधिकृत ठरवत महसूल प्रशासनाने या सर्वांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली होती. मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या २३ अनधिकृत इमारत मालकांविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. 
शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी तपकिरकर यांनी दिलेल्या तक्रारीत यासर्व इमारत मालकांना तालुका महसूल प्रशासन,प्रांताधिकारी,जिल्हाधिकारी यांच्याकडून अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या. मात्र या नोटीसांना कोणतेही उत्तर न देता अनधिकृत बांधकाम इमारत मालकाने हटविले नाही असे सांगण्यात आले. दरम्यान या कारवाई नंतर स्कुबा डायव्हिंग सेंटर आपली इमारत अधिकृत आहे याबाबतचा प्रस्ताव व काही कागदपत्रे पोलिसांना सादरही केली होती. 
या कारवाईत मंडळ अधिकारी तपकीरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अभिजित प्रकाश परब, राणाप्रताप रणधीर सिंग, किशोर वसंतराव तारी, (तिघेही रा. देवबाग), प्रफुल्ल मांजरेकर, प्रकल्प संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सिंधुदुर्ग यांचे स्कुबा डायव्हिंग सेंटर,प्रादेशिक व्यवस्थापन महाराष्ट्र विकास महामंडळ रत्नागिरी,यांचे स्कुबा डायव्हिंग सेंटर,विलीमा हालेस डिसोजा,ऋषिकेश वामन बर्वे,सुनील रमाकांत केळुसकर,अरविंद काशिनाथ बांदेकर,शशिकांत राघोबा केळुसकर,आनंद जनार्दन मालंडकर,विजय रागुनाथ केळुसकर,संजय सदाशिव केळुसकर,अंकुश सीताराम केळुसकर,चारुदत्त गोविंद केळुसकर,प्रफुल्ल गजानन मांजरेकर,रामचंद्र कुबल,दशरथ चित्रसेन केळुसकर,संतोष राधाकृष्ण हुले,विलास विठोबा ताम्हणकर,राजन काशिनाथ तांडेल,श्रीकृष्ण मधुकर झाट्ये या २३ इमारत मालकांविरोधात केंद्रीय पर्यावरण संरक्षण कायदा १९८६-५ व सीआरझेड अधिनियम १९९१ व २०११कलम १५ नुसार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार श्री धुरी व श्री जानकर अधिक तपास करीत आहेत. 
या प्रकरणी व्यवसायिकांनी व स्थानिकांनी तालुक्यातील भाजपा पदाधिकार्यांसोबत महसूल मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना हि कारवाई पावसाळी कालावधीत थांबवावी असे आदेश दिल्याचे भाजपने सांगितले होते. पालकमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत बांधकामे नियमात करण्याबाबत न्याहारी निवास अन्य योजनेत हि बांधकामे परिपूर्ण प्रस्तावात बसतील याबाबतही व्यवसायिकांनी प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना मांडल्या. या बैठकीत प्रांताधिकारी, तहसीलदार आदि उपस्थित होते. व्यवसायिकांनी त्याप्रमाणे कागदपत्रे सादर करण्यास सुरवात केली. मात्र पोलिस प्रशासनाने बांधकामाची पंचनामा प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यामुळे देवबाग किनारपट्टीवरील व्य्व्सायीकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. एकूणच महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतरही हि कारवाई सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 


Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment